कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विभाग हा कायमच काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसची विचारधारा जपणाऱ्या या कराड उत्तर मतदार संघात तसेच जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संघटन मजबूत करून ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकताच कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाल, सैदापूर आदी जिल्हा परिषद गटामध्ये कराड उत्तर ब्लॉकचा दौरा करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात तसेच सर्जेराव पाटील यांनी उपस्थिती लावली होती.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन वाढावे तसेच प्रत्यक्ष भेटीतून संवाद वाढविण्यावर भर द्यावा यासाठी या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुरेश जाधव म्हणाले कि, काँगेस पक्ष हा विचारांचा पक्ष आहे. या पक्षाने आजपर्यंतच्या निवडणूका या विचारांनी लढल्या आहेत, आणि तीच शिकवण काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळत गेली आहे. सत्ता असो किंवा नसो काँग्रेसचा विचार जपणारे करोडो लोक आजही काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहेत.
यावेळी कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात म्हणाले कि, आपले नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी काँग्रेसचे संघटन राज्यात तर केलेच पण जिल्ह्यात सुद्धा केले पण त्या त्या वेळच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करता स्वतःच्या विकासावर अधिक भर दिल्याने जिल्ह्यात काँग्रेस मागे पडली पण आता स्वतः पृथ्वीराज बाबा जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा एकदा उभा करायला सरसावले आहेत आणि त्यांना आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते साथ दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देश जोडला असल्याने सर्वसामान्य जनता काँग्रेसशी जोडली आहे. काँग्रेसचं सामान्य नागरिकांचा विचार करते व त्यांच्या हिताचे निर्णय घेते म्हणूनच आपला भारत देश उभा राहिला विकसित झाला.