अजित पवारांसह खासदार, आमदारांनी जात्यांध पक्षांबरोबर जाणं देश हिताचं नाही – श्रीनिवास पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । “ईडी, इन्कम टॅक्सची भीती आणि राजकीय दबावातून अजित पवारांसह खासदार, आमदारांनी जात्यांध पक्षांबरोबर जाणं राजकीयदृष्ट्या देश हिताचं नाही,” असं वक्तव्य खासदार श्रीनिवास पाटील यांनी निष्ठावतांच्या मेळाव्यात केलं आहे.

वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सारंग पाटील, डॉ. सुनील सावंत, प्रसाद सुर्वे, निलेश डेरे, विजयसिंह पिसाळ, दिलीप बाबर, राजेंद्र भिलारे, यांंच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या लोकशाहीवर अनेक अनेक संकटे आली. ती परतवून लावण्याची ताकद फक्त शरद पवारांमध्ये आहे. त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची नितांत गरज आहे. सातारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्ताने आली असल्याचेही श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळत नसल्याचे लक्षात आल्याने देशाच्या राजकारणात भाजपाकडून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाण, किसन वीर, लक्ष्मणराव पाटील यांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांचे विचार केंद्रबिंदू मानूनच सातारा जिल्ह्याचे राजकारण होईल. तसेच भाजपाकडून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यापुढे ते हद्दपार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरावी लागेल.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. परंतु त्याची त्यांना जाण नाही. सध्याची लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, अजित पवार यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले. मात्र, शरद पवारांचा विचार चोरू शकत नाहीत. देशामध्ये सध्या ईडी व इन्कम टॅक्सची भीती दाखवल्याने अजित पवारांसह अनेक आमदार-खासदार जातीयवादी पक्षांमध्ये पक्षांमध्ये सामील होत आहेत. जनता मात्र शरद पवारांच्या पाठीशी आहे. देशाच्या सत्तेत बदल घडविण्याची क्षमता फक्त शरद पवार यांच्यामध्येच असल्याने पक्ष्यांची मोट बांधण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.

यावेळी डॉक्टर सुनील सावंत, सतीश बाबर, प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर, विजयसिंह पिसाळ, निलेश डेरे, सुधाकर गायकवाड आदींची भाषणे झाली. सभेला वाई विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंतांनी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती.