सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हयातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वातावरणात महायुती आणि महाविकास आघाडीकरून पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेतले जात आहेत. अशात नुकताच कोरेगाव तालुक्यात वडाचीवाडी येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यात खासदार श्रीनिवास पाटील यांनी चांगलेच दमदार भाषण केले. “सातारा कधी वाकत नाही. त्यामुळे येथे तुतारीशिवाय काही वाजणारच नाही, अशा शब्दांत खासदार पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, नितीन बानगुडे पाटील, सारंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या संजना जगदाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अॅड. वर्षा देशपांडे आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी खा. पाटील म्हणाले की, सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्यासोबत मी काही काळ घालवला आहे. त्यांच्या विचारांना अनुसरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात हातात मशाल घेऊन तुतारी वाजवावी.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकच कोरेगाव मतदारसंघातील विजयाचे शिल्पकार होते. मात्र, शिवसेनेत झालेल्या गद्दारीमुळे आता पेटून उठलेले निष्ठावंत शिवसैनिक गद्दाराच्या पराभवाचे शिल्पकार ठरणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले.