कराड प्रतिनिधी । कराडसह लोणंद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. यावेळी कराड येथे रेल्वे स्टेशनवरती झालेल्या या कार्यक्रमास आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. “रेल्वेच्या विकासकामांमुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून रेल्वे सेवा गतिमान होईल,” असा विश्वास यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राजेंद्र यादव यांच्यासह अमृत भारत योजना गतिशक्तीचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर श्री. प्रकाश उपाध्याय, पुणे डिव्हिजनचे सीनियर मेकॅनिकल इंजिनिअर श्री.दीपक खोत, कराडचे स्टेशन मॅनेजर श्री.एन.जी.अलेक्झांडर, श्री.गोपाल तिवारी, श्री.मुकुंद भट आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील रेल्वे सेवा सुरळीत व्हावी, त्यात आणखी सुधारणा व्हावी. रेल्वे स्टेशन व परिसराचा विकास व्हावा. रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. आवश्यक ठिकाणी अंडरपास, ओव्हरपास ब्रिज व्हावेत याकरिता लोकसभेत व रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यातील बरेचसे प्रश्न मार्गी लागून त्या कामांचे भूमिपूजन आज झाल्याने आनंद आहे. या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून रेल्वे सेवा गतिमान होईल.
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आपल्या सातारा जिल्ह्यातील कराड आणि लोणंद या दोन्ही रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होऊन कायापालट होणार आहे. तर पिंपळे खुर्द, शिरढोण, जरंडेश्वर आणि पार्ले येथे रेल्वे अंडरपास ब्रिज होणार आहेत. या सर्व कामाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.