सातारा प्रतिनिधी | मुक्त सृजन साहित्य पत्रिका छत्रपती संभाजीनगर व महाबळेश्वर गिरिस्थान महाविद्यालय यांच्या वतीने महाबळेश्वर येथे दि. 21 व 22 जानेवारी रोजी दुसरे मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन कवी ना.धो. महानोर साहित्य नगरीत संपन्न होत आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सातारा लोकसभा खा. श्रीनिवास पाटील हे असून संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील हे आहेत. या संमेलनाचे उद्घाटक प्रा. राजा दीक्षित हे आहेत.
रविवार दि. 21रोजी सकाळी कवी देविदास फुलारी,नांदेड आणि लेखिका सना पंडित, नागपूर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन होणार असून त्यानंतर नरेंद्र पाठक, ठाणे आणि स्वाती महाळंक पुणे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुसर्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ.मकरंद पाटील, अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, मुख्याधिकारी योगेश पाटील, ज्ञानोबा केंद्रआणि डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
त्यानंतर मुक्त सृजन साहित्य पुरस्काराचा वितरण सोहळा होणार असून त्यात प्रकाश जडे, राजेंद्र शेंडगे, शशिकांत हिंगोणेकर, वसंत गायकवाड, देवेंद्र पुनसे, अप्पासाहेब खोत, मॅटील्डा डिसिल्वा, सुरेश सावंत, मच्छिंद्र ऐनापुरे, अविनाश सांगोलेकर, मारुती घुगे, किसन माने, अरुण घोडके, विजय शेंडगे, प्रीती वाडीभस्मे, संभाजी पाटील, मेघना साने यांना पुरस्कृत केले जाणार असून मीरा निचळे, मंदाकिनी पाटील,हर्षदा सुनठणकर, मुकुंद वलेकर, संगीता मासाळ,अलकनंदा घुगे, विजयकुमार कस्तुरेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलनात एकूण 3 परिसंवाद होणार असून ‘संत साहित्यातील पर्यावरण’ हा पहिला परिसंवाद डॉ. मुरहरी केळे, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर परिसंवाद दोन ‘शासनाची भूमिका,साहित्य संस्थांची जबाबदारी आणि साहित्यिकांचे वर्तन’ हा परिसंवाद प्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे तर तिसरा परिसंवाद, ‘रील्सचा आला महापूर, साहित्यिकांची झाली गोची, सहसंवेदनेची कशी वाढेल उंची’हा शिरीष चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या संमेलनात एकूण दोन कवी संमेलन होणार आहेत.