सातारा प्रतिनिधी । “पोलीस दलामध्ये नागरिकांशी संवाद साधणे हे महत्वाचे असते. आमच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. ज्या प्रमाणे त्यांना राष्ट्रपदी पदकाने सन्मानित करण्यात आले आहे, त्याच पद्धतीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस स्टेशनला सन्मानित करण्यात आले आहे. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या यशाची कथा ही एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी सर्वच पोलीस स्टेशनने कामकाज करून अव्वल नंबर काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या निमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडुकर, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, विलासराव नलवडे, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. जे. टी. पोळ यांच्यासह सातारा जिल्हा पोलीस दलातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फुलारी म्हणाले की, पुसेगाव पोलीस स्टेशनच्या यशाची कथा ही एक प्रेरणादायी उदाहरण आहे. या पोलीस स्टेशनने नागरिकांशी संवाद साधून आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करून एक आदर्श स्थापित केला आहे. या पोलीस स्टेशनने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून मिळालेल्या सन्मानाचा गौरव मिळवला आहे. हे यश संपूर्ण पोलीस दलासाठी एक प्रेरणा आहे.