सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष खर्च निरीक्षक श्री. बी. आर. बालकृष्णन यांनी नुकताच सातारा जिल्ह्यातील निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. यावेळी निवडणुकीत विविध प्रकारची प्रलोभने, मद्य किंवा पैसे यांच्या आधारावर मतदान होऊ नये. संपूर्ण मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शीपणे व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी, तसेच पकडलेल्या पैशांच्या स्त्रोतांचा छडा लावावा. यासाठी संपूर्ण यंत्रणेने प्रभावी काम करावे, असे निर्देश विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिले.
यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यादव, पी. सैंथील, आचारसंहिता कक्षप्रमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनंसरक्षक आदिती भारद्वाज, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.
निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी, असे सांगून श्री. बालकृष्णन म्हणाले, “ज्या रक्कमा पकडल्या जात आहेत, त्यांच्या स्त्रोताचा छडा लावावा. बँकांमार्फत पैशाचे वहन होत असताना त्यावर क्यूआर कोड आवश्यक आहे. तो क्यूआर कोड मॅच होणे बंधनकारक आहे. ज्या संशयित खात्यांत एक लाखांवर रकमेचे आदान प्रदान होते, अशा सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्यांचे तपशील खर्च नियंत्रण पथकाला दररोज देण्यात यावे.
एखाद्या खात्यावरून एकापेक्षा जास्त खात्यांवर रक्कम प्रदान होत असल्यास अशा बँक खात्यांचा रिपोर्टही दुसऱ्या दिवशी त्वरित खर्च नियंत्रण पथकाला सादर करावा, तसेच संशयास्पद खात्यांवर देखरेख ठेवावी. याबरोबरच इलेक्ट्रॉनिक दुकाने, पेट्रोल पंपावर आदी विविध ठिकाणी अनधिकृत रकमांची देवाणघेवाण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. मद्याचे अनधिकृत वितरण होणार नाही, याबाबतही दक्षता घ्यावी. मोठ्या व्हॉटस्अॅप ग्रुपची तपासणी करण्यात यावी.” जिल्हाधिकारी डुडी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती दिली.