कराड प्रतिनिधी । सध्या मोठ्या प्रमाणात चित्रपट, मालिकांचा प्रभाव व्यक्तिगत जीवनावर वाढला आहे. चित्रपट, मालिका पाहून जीवनशैलीचे अनुकरण केले जात आहे. शिवाय लग्नसमारंभातही तशाच थाटात केले जात आहे. लग्नात नातेवाईक, मित्रमंडळी खास डान्स करतात. मात्र, त्याची तयारी दोन ते तीन आठवडे पूर्वीपासून सुरू असते. त्यासाठी खास कोरिओग्राफरना बोलावले जात आहे. सातारा जिल्ह्यात देखील अनेक कोरिओग्राफर आहेत. त्यामध्ये कराडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर मीनल ढापरे यांचा देखील खास करून समावेश होतो.
सातारा जिल्ह्यात देखील शाही पद्धतीचे विवाह समारंभ पार पडत असून या विवाह समारंभात डान्स केले जात आहेत. शिवाय लग्नाप्रमाणे प्री विडिंगसाठी देखील कोरिओग्राफरची मागणी केली जात असून आता आहे एक व्यवसायाचे नवे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे.
पूर्वी लग्नाच्या आदल्या दिवशी हळद, मेहंदी व दुसऱ्या दिवशी लग्न, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा एवढा सीमित कार्यक्रम असायचा. मात्र, आता लग्नसोहळा चार ते पाच दिवस साजरा करण्यात येत आहे. हळद, मेंदी, असे स्वतंत्र कार्यक्रम साजरे करताना, ‘संगीत’ हासुद्धा स्पेशल कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यासाठी खास कोरिओग्राफर बोलावून तयारी केली जाते. नृत्याचे व्हिडीओ तयार करतात.
कराड शहरातही मोठ्या लग्न समारंभासाठी कोरिओग्राफर्सची मागणी
सिनेमा, मालिकेप्रमाणे लग्नापूर्वी संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला जातो. नृत्य कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्याचा आग्रह असल्याने कोरिओग्राफर्सची आवश्यकता भासते. अलीकडे कराड शहरात देखील लग्न, हळदी सारखे कार्यक्रमामध्ये डान्सचे आयोजन केले जात असून त्यासाठी मी कोरिओग्राफी केलेली आहे. अशा इव्हेंटसाठी कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये खर्च आकारला जातो. लग्नाच्या अगोदर 10 ते 15 दिवस सराव केला जात असल्याची प्रतिक्रिया कराड येथील प्रसिद्ध कोरिओग्राफर मीनल ढापरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
लग्न समारंभात संगीत रजनीचे आयोजन
खास करून लग्नाच्या आदल्या रात्री खास संगीत रजनीचे आयोजन केले जाते. विशेष थीम घेऊन नियोजन केले जाते. त्यामध्ये होणारी वधू किव्हा वर आपआपल्या घरी आयोजित संगीत रजनी कार्यक्रमात नृत्य करतात.
वधू-वराचा हीरो- हिरोइनसारखा थाट!
आपला विवाह हा कायम लक्षात रहावा असं प्रत्येक वधू आणि वराला वाटत असतं. त्यासाठी सिनेमा, मालिकांतील हीरो-हिरोइनप्रमाणे नृत्यामध्ये नवरा, नवरी तयार होऊन थाटात वावरत असतात. कसे चालावे, नृत्य कसे करावे याचा देखील काहीजण कोरिओग्राफर यांच्याकडून घेतात.
साइड डान्सर अन् वऱ्हाडींचा ठेका
लग्नातील महत्वाच्या संगीताच्या कार्यक्रमात कोरिओग्राफरची भूमिका खूप महत्वाची असते. अगदी ज्येष्ठांपासून बच्चे कंपनीपर्यंत त्यांच्याकडून नृत्य बसविण्यात येते. सहनृत्य कलाकार वहाडी मंडळींना नृत्यावर ठेका घेण्याचे शिकवतात.
‘रिल्स’चा प्रभाव वाढला
सोशल मिडियावरील ‘रिल’ पाहून लग्न सोहळा अवर्णनीय करण्याचा घाट घातला जात आहे. संगीत रजनी आयोजित करताना, नृत्य व त्यास साजेशी वेशभूषा, केशभूषा केली जाते.
१५ ते २० दिवस अगोदर सराव
लग्नातील संगीत कार्यक्रमात सादरीकरण केलेल्या नृत्याची वाहवा व्हावी, यासाठी कोरिओग्राफरच्या मार्गदर्शनाखाली दोन ते तीन आठवडे सराव केला जातो. कोरिओग्राफर वयोमानानुसार गाण्याच्या तालावर ठेका बसवितात.
कोरिओग्राफरला मिळतोय रोजगार
संगीत कार्यक्रमात सादर करायचे नृत्य शिकवण्यासाठी खास कोरिओग्राफरला बोलावले जाते. त्यातून कोरिओग्राफरना रोजगार मिळाला आहे. सातारा जिल्ह्यात सध्या नृत्य करणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी करिअरच्या दृष्टीने हि एक चांगली संधी आहे.