सातारा प्रतिनिधी । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने फलटण येथे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हंगाम २०२४-२५ मध्ये सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू झाली असून, ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नावनोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.
बाजारामध्ये सोयाबीन शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यासाठी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून, याकरिता सबएजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवड करण्यात आली आहे. सोयाबीन या शेतमालाचा हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल असून, कमाल आर्द्रता १२ टक्के आवश्यक आहे. सन २०२४-२५ च्या सातबारावर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सरासरी उत्पादकता विचारात घेता प्रतिहेक्टरी २६ क्विंटल सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे. त्याच दिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा, हमीभाव खरेदीबाबत अधिक माहितीसाठी फलटण तालुका खरेदी – विक्री संघाचे व्यवस्थापक, विठ्ठल जाधव व स्वप्नील देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.