साताऱ्यात सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता सातारा तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्केट यार्ड सातारा, संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक प्रत व त्यांचे नावे असणारा आठ अ व सातबारा उतारा (त्यावर चालू वर्षी सोयाबीन पीक पेरा नोंद असणे आवश्यक) खरेदी केंद्रांवर सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांशिवाय शेतकऱ्यांची नोंदणी होणार नाही. ऑनलाइन नोंदणीनंतर क्रमवारीनुसार शेतकऱ्याला केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्यास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन माल घेऊन येताना तो स्वच्छ असावा.

संबंधित शेतकऱ्यांनी त्यांना दिलेल्या वेळेत केंद्रावर नाफेडने निश्चित केलेल्या एफएक्यू दर्जाचे म्हणजेच चांगले वाळवलेले बारा टक्के पेक्षा कमी आर्द्रता असलेले व काडी-कचरा, दगड माती नसलेले सोयाबीन घेऊन येणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन केंद्रावर आणण्यापूर्वी नमुना घेऊन आर्द्रता व प्रतवारी तपासणी करून घेतल्यास गैरसोय होणार नाही. शेतकऱ्यांनी खराब व भिजलेले सोयाबीन केंद्रावर आणू नये, खराब माल स्वीकारण्यात येणार नाही.मालाची आद्रता कमाल १२ टक्के असावी, सदर बाबतीत मार्गदर्शक सुचना खरेदी केंद्रावर लावण्यात आलेल्या आहेत. सदरची नोंद सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी घ्यावी, अशी माहिती सातारचे सहकारी संस्था, उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.