सातारा प्रतिनिधी | मॉन्सूनोत्तर पाऊस थांबल्याने आता जिल्ह्यात शेतकऱ्यांची रब्बी पिकांच्या पेरणीची गडबड सुरू झाली. यंदा या हंगामात जिल्ह्यात दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, आतापर्यंत १८ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, मका व हरभऱ्याची पेरणी झाली आहे, तसेच खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.
यंदा पावसाचा कालावधी दिवाळीपर्यंत सुरू राहिल्याने रब्बीची हंगाम लांबणीवर पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ज्वारीची सातारा ५५५ हेक्टर, जावळी १०, कऱ्हाड ८८५, कोरेगाव ४७७, खटाव दोन हजार ६२७, माण नऊ हजार ५८७, फलटण एक हजार २७०, खंडाळा १२८, वाई ७५१ अशा एकूण १६ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ३७ हजार ३७४ हेक्टर गव्हाचे क्षेत्र असून, त्यापैकी वाई तालुक्यात एक हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्याचे १० हजार २०९ हेक्टर क्षेत्र असून, सातारा चार, कऱ्हाड नऊ, खटाव ५१४, माण एक हजार १४७, फलटण ४८० असे मिळून दोन हजार १५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे २७ हजार ७५३ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी माण तालुक्यात ९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. करडईचे १२६.७० हेक्टर क्षेत्र आहे.
रब्बीसाठीचे क्षेत्र
सातारा तालुका : १४ हजार ९७० हेक्टर
जावळी : आठ हजार ११ हेक्टर
पाटण : १७ हजार ८०९ हेक्टर
कराड : १४ हजार ७३२
कोरेगाव : २१ हजार २६६
खटाव : २९ हजार ८२१
माण : ४६ हजार ४१८
फलटण : ३० हजार ८९०
खंडाळा : १३ हजार ९५३
वाई : १४ हजार ६८९ महाबळेश्वर : ६४५