सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पेरणी केली जाते. सातारा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पेरणीची टक्केवारी ९७ झाली असल्याने या वर्षी सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जात असून जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १४ हजार ३६९ हेक्टर, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आणि सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प असते. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर पेरणी लवकर होते. यंदा पावसाला वेळेवर आणि दमदार सुरुवात झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्क्यांवर पेरणी पूर्ण झालेली असून सध्या २ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर पीक आहे. यामुळे लवकरच खरिपाची पेरणी पूर्ण होणार आहे. आतापर्यंत भाताची ८८ टक्के लागण झाली. म्हणजे ३८ हजार ६१७ हेक्टरवर भात घेण्यात आलेला आहे. अजूनही पश्चिम भागात भात लागणीची कामे सुरूच आहेत. त्यामुळे क्षेत्रात वाढ होणार आहे.
ज्वारी, मका आणि भुईमुगासह या पिकांची ‘इतके’ हेक्टरवर पेरणी
ज्वारीची ६ हजार ८४१ हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. बाजरीची पेरणी ६९ टक्के झाली आहे. ४१ हजार ७९८ हेक्टरवर पेरणी झाली असून, यंदाही या पिकाखालील क्षेत्र कमी राहणार आहे. मका पिकाची १२० टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. १८ हजार १६४ हेक्टर पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भुईमुगाची ९३ टक्के म्हणजेच सुमारे २७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत सुमारे ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण १२१ टक्के झाले आहे. सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे.
कराड, पाटणसह खटावमध्ये ‘इतके’ टक्के पेरणी
पाटण तालुक्यात ४३ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. कराड तालुक्यात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या सुमारे ३७ हजार हेक्टरवर पिके आहेत. कोरेगाव तालुक्यात १०२ टक्के पेरणी झाली. २१ हजार १६२ हेक्टरवर पिके घेतली आहेत. खटाव तालुक्यात ९१ तर माणमध्ये १०१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. खटावमध्ये सुमारे ४२ हजार, तर माण तालुक्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटणला १०२, वाई तालुक्यात ९८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातही ९० टक्के पेरणी झालेली आहे.