सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 ऑगस्टला निघणार सैनिक आक्रोश मोर्चा; नेमक्या मागण्या काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आजी व माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ द्यावी तसेच दि. 25 ऑगस्टपर्यंत सदरच्या मागण्यांवर कार्यवाही करावी अन्यथा, दि. 30 रोजी शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘सैनिक आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी त्रिदल सैनिक संघ सातारा, सैनिक फेडरेशन सातारा, सैनिक समाज पार्टी सातारा, जवान किसान पार्टी सातारा, प्यारा मिलिटरी संघ सातारा, सैनिक समता दल सातारा, तसेच अशा अनेक माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकवेळा सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांच्या वतीने सैनिकांच्या विविध समस्या, अडचणींविषयी निवेदने देत त्यांच्या भेटीसाठी वेळ मागण्यात आली. परंतु, त्यांनी आजतागायत सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेटीची वेळ दिली नाही.

सातारा जिल्ह्याच्या सैनिकांची बैठकही बोलावली नाही तसेच जिल्ह्यामध्ये 26 जुलै कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. परंतु, त्या कार्यक्रमासाठी शहीद जवान कुटुंबीयांच्या सन्मान करण्यासाठी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. या सर्व बाबींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघ यांना भेटीची वेळ द्यावी. तसेच दि. 25 ऑगस्टपर्यंत सदरच्या मागण्यांवर कार्यवाही व्हावी. अन्यथा, दि. 30 शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘सैनिक आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आले आहे.