सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सौरउर्जेच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. जिल्ह्यातील विविध वर्गातील ८७४३ ग्राहकांनी महावितरणच्या माध्यमातून सोलर रुफ टॉफ यंत्रणा स्थापित केली आहे, ज्यामुळे ते स्वतःची वीज निर्मिती करू लागले आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता २७३ मेगावॅट असून, शासनाकडून अनुदान दिले जात आहे.
सोलर रुफ टॉफ प्रकल्पांतर्गत, ग्राहकांनी घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, उच्च दाब, सार्वजनिक पाणी योजना, पथदिवे आदी वर्गवारीतील वीज वापराच्या गरजेनुसार छतावर सोलर पॅनेल्स बसवले आहेत. ग्राहकाने तीन किलोवॅटपर्यंत सोलर रुफ टॉप प्रकल्प बसवल्यास, त्याला हवी तितकी वीज वापरून उरलेली वीज महावितरणला विकता येते. सोलर नेट मिटरिंगद्वारे ग्राहकाने किती वीज महावितरणला दिली याची नोंद ठेवली जाते.
पावसाळ्यात सोलर प्रकल्पाद्वारे वीजनिर्मिती न झाल्यास, महावितरणकडून त्या ग्राहकाला विजेच्या मोबदल्यात वीज दिली जाते. यामुळे जिल्ह्यातील ग्राहक सौरउर्जेकडे वळू लागले आहेत आणि वीजेबाबतही स्वयंपूर्ण होऊ लागले आहेत. महिन्याला तयार होणारी वीज ३ कोटी २७ लाख युनीट इतकी आहे.