कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ कोयनेश्वर मंदिर परिसरातही घोणस या विषारी सापांचा वावर वाढला आहे. सकाळी कोयनेश्वर मंदिराच्या वडाच्या झाडाखाली घोणस आढळल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली. त्यासह येथील प्रीतिसंगम संगम बागेत सलग चौथ्या दिवशीही घोणस जातीच्या सापांची शोध मोहीम सुरू होती. कराड रेस्क्यू पथकाच्या २० हून अधिक स्वयंसेवकांनी आतापर्यंत १४ पिल्ले पकडली आहेत. सोमवारी सकाळीही सर्पमित्रांनी त्यांचे शोध कार्य सुरू ठेवले होते. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी बागेत भेट देऊन सर्पमित्र व पालिका कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
येथील प्रीतिसंगम बागेत तीन दिवसांतून घोणस जातीच्या विषारी सापांचा वावर वाढला आहे. तिने पिल्लांना जन्म दिल्याने तेथे फिरायला येणाऱ्या नागरिकांना धोका वाढला आहे. सर्पमित्रांनी आजअखेर तब्बल १४ पिल्ले पकडली आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी सोडले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी सभापती वाटेगावकर यांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची भेट घेतली. त्यांनी बागेतही भेट देऊन तेथील आढावा घेतला. बाग व परिसरातील कचरा उचलण्यासाठी व अन्य कामासाठी जेसीबी आवश्यक असल्याने त्याची मागणी श्री. वाटेगावकर यांनी केली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रीतिसंगम बाग, रंगारवेस परिसर व कोयनेश्वर मंदिर येथे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून दक्षता घेण्याबाबत आवाहन करणारे पालिकेचे फलक लावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच कोयनेश्वर मंदिराच्या परिसरातही घोणस जातीच्या विषारी सापाचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. तेथेही सर्पमित्रांनी शोधमोहीम राबवली, मात्र तेथे काहीही आढळून आले नाही. पालिकेकडून प्रीतिसंगम बाग, कोयनेश्वर मंदिर परिसरात फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.