साताऱ्यातील स्मार्ट जलमापकांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात बुधवार, दि. २ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. सातारा पालिकेने सातारकरांना विशेष सुविधा देण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. सातारा शहराला कास तलाव व उरमोडी नदी अर्थात शहापूर उद्भव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो.

सातारा शहरासह हद्द वाढीच्या भागात साधारण साडेआठ हजार नळ कनेक्शन आहेत. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्याचे नियमन करणे, त्याचे वॉटर ऑडिट होणे तसेच पाण्याची गळती होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट जलमापके बसवण्याचे नियोजन आहे नगरोत्थान योजनेतर्गत या प्रकल्पाला निधी दिला जात आहे.

या जलमापकांचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे छत्रपती शिवाजी सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे.