सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे नुकताच एक धोकादायक प्रकार घडला आहे. येथील गायरान गट क्रमांक ४२० मधील १० हेक्टर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाने लाखो रुपये खर्च करून ११ हजार १११ हजार झाडे लावली होती. मात्र, सोलर कंपनीच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडांवर जेसीबी फिरवून सर्व भुईसपाट केली आहे. या घडलेल्या प्रकारामुळे शिंगणापूर ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त केला आहे. वृक्षतोड करणाऱ्या सोलर कंपनीवर तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या गायरान जागेत महावितरण कंपनीमार्फत मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याठिकाणी एका सोलर कंपनीमार्फत संबंधित जागा सपाटीकरण करून चाचणी घेण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु, सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जागेतील जवळपास दहा हेक्टर क्षेत्रात तीन वर्षांपूर्वीच्या ११ हजार वृक्षांची लागवड केली होती.
सामाजिक वनीकरण विभाग तसेच शिंगणापूर ग्रामपंचायतीने टँकरने पाणी घालून या झाडांचे संगोपन केले होते, तसेच याच परिसरात सावली देणारी मोठी झाडेही होती. मात्र, महावितरणअंतर्गत सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी संबंधित सोलर कंपनीने सामाजिक वनीकरण विभाग तसेच शिंगणापूर ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता याठिकाणी लागवड केलेल्या हजारो झाडांवर जेसीबी चालवून कत्तल केली आहे.
वृक्ष लागवड प्रकल्पाचे शासनाचे लाखो रुपये पाण्यात
या प्रकारामुळे वृक्ष लागवड प्रकल्पाचे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. सोलर कंपनीने हजारो झाडांची कत्तल केल्याने शिंगणापूर ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमी संतप्त झाले असून, याप्रकरणी दोषी असलेल्या महावितरण अधिकारी, सोलर कंपनी, संबंधित ठेकेदार यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा ता. ११ मे रोजी माण तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आत्मदहनाचा इशारा
याबतचे निवेदन मुख्यमंत्री, सामाजिक वनीकरणमंत्री, सातारा जिल्हाधिकारी, माण प्रांताधिकारी, तहसीलदार, सामाजिक वनीकरण कार्यालय, दहिवडी पोलिस ठाणे यांना देण्यात आले आहे, तसेच पर्यावरणाची हानी करून वृक्षतोड करणाऱ्या संबंधितांवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गोंदवले येथील रोहित रक्षिता फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
ग्रामपंचायत दाखल करणार गुन्हे
शिखर शिंगणापुरात सौरऊर्जा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेतील हजारो झाडांची कत्तल केल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. झाडे तोडण्यापूर्वी महावितरण, सोलर कंपनी तसेच संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायत कार्यालयाशी कोणताही संपर्क केला नाही. सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून तसेच कायदेशीर बाबी माहिती घेऊन हजारो झाडांची कत्तल करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे शिंगणापूर सरपंच सारिका शेंडे व उपसरपंच राजू पिसे यांनी म्हटले आहे.