कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तांबवे गाव सध्या दहशतीखाली आहे. त्याला कारण ठरलंय कारवानी जातीचं पिसाळलेलं कुत्रं. पाळीव परंतु पिसाळलेल्या या कुत्र्याने तांबवे गावातील पाच ते सहा जणांवर हल्ला करीत त्यांचा चावा घेतला. तसेच या कुत्र्याने इतर ३ भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना देखील जखमी केले आहे. जखमींमध्ये तांबवेसह परिसरातील गावातील लोकांचाही सहभाग आहे. सैरावैरा धावताना समोर येईल त्याला चावा घेत असल्याने पालक, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन भटक्या कुत्र्यांवरही हल्ला
दुसऱ्या गावातून आलेले कारवानी कुत्रे पिसाळले आहे. सहा ते सात तरूणांना या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यात सगळ्यांनाच गंभीर इजा झाली आहे. तीन भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना चावा घेतला आहे. यामुळे रानामाळात जाणाऱ्या नागरीकांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची सध्या मोठी दहशत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरु : पोलीस पाटील पवन गुरव
तांबवे गावात पिसाळलेल्या कारण जातीच्या कुत्र्याने गावातिक काही जणांवर हल्ला केला आहे. हल्ल्यातील जखमी झालेल्यांकडून दवाखान्यात जाऊन उपचार घेतले जात आहेत. गावातील लोकही त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा श्योद्ध घेत आहेत मात्र, अद्याप ते सापडलेले नाही, अशी माहिती तांबवे येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या घडलेल्या घटनेनंतर तांबवे गावचे पोलीस पाटील पवन गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
तरूणांकडून कुत्र्याचा पाठलाग
कुत्र्याला मारण्यासाठी दुपारी तांबवे गावातील तरूणांनी काठ्या घेऊन कुत्र्याचा पाठलाग केला. मात्र, पिसाळलेले कुत्रे गावंदर शिवाराकडे पळाले. मात्र, पुन्हा ते गावात घुसले. त्यामुळे संपूर्ण गावच पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीखाली आहे. या कुत्र्याचा बंदोबस्त कसा करायचा, याचीच सगळ्यांना चिंता लागून राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी अशीच घडली होती घटना
काही दिवसांपूर्वी आरेवाडी आणि साजूरमध्ये अशीच घटना घडली होती. शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. तेथून साजूरकडे गेल्यानंतर एका नागरीकाला आणि जनावरालाही कुत्रे चावले होते.