सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरात सद्या मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच मारहाणीची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक स्टॉलधारकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंकडून हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून, याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामामुळे पर्यटकांची रेलचेल असताना मुंबई येथून आलेल्या माखिजा या पर्यटक कुटुंबीयांना वेण्णालेक परिसरातील डिझिलँड गेम या दुकानासमोर गाडी थांबविण्याच्या किरकोळ कारणावरून पर्यटक व स्टॉलधारक यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली. त्याचे पर्यावसन तुफान हाणामारीमध्ये झाले.
या हाणामारीत पर्यटक शम्मी नंदलाल माखिजा (वय ६०), दर्शन दीपक रोहिरा (वय ४५), हंसराज शम्मी माखिजा (वय ३६), निहाल नंदलाल माखिजा (वय ४८), सागर शम्मी माखिजा (वय ३५), रौनक निहाल माखिजा (वय २१ सर्व रा. मुंबई) हे जखमी झाले. जखमींवर महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
फिर्यादी माखिजा यांच्या जबाबानुसार सौद सुजाऊद्दीन शेख (वय ३४), आसिफ आरिफ शेख (वय २४), अरबाज सिद्दीक शेख (वय २६), सेहबाज सुजाउद्दीन शेख (वय ३१), सुफियान सिद्दीक शेख (वय २२) व आदिल आरिफ शेख (वय २४ सर्व रा. रांजणवाडी, ता. महाबळेश्वर) या सहा युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर हे अधिक तपास करत आहेत.