सातारा प्रतिनिधी | किरकोळ कारणावरून आपल्या घरातील मंडळींनी ओरडले तर काहीजण टोकाचा निर्णय घेतात. अशीच घटना साताऱ्यात नुकतीच घडली आहे. घरात न सांगता ती फिरायला गेली. त्यानंतर तिने माेबाइलवर स्टेट्स ठेवला. भावाने हे पाहिल्यानंतर तिच्यावर तो संतापला. भाऊ रागावून बोलल्याचे तिच्या जिव्हारी लागल्याने तिने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची घटना सदरबझार, लक्ष्मी टेकडी येथे घडली.
मातम्मा भीमाशंकर शिंगे (वय २१, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार सातारा, मूळ रा. कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मातम्मा ही सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. सोमवारी सकाळी ती सातारा शहर परिसरात फिरण्यासाठी गेली होती. मात्र, बाहेर जाताना तिने घरात सांगितले नाही.
फिरायला गेल्यानंतर तिने तिचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या माेबाइलवर स्टेट्स ठेवले. हे स्टेट्स तिच्या भावाने पाहिल्यानंतर भाऊ संध्याकाळी घरी आला. तू स्टेट्स ठेवलेस अन् तू न सांगता फिरायला का गेलीस म्हणून भाऊ संतापला. याचा राग तिला अनावर झाल्याने तिने विषारी औषध प्राशन केले. घरातल्यांनी तिला तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे हे अधिक तपास करीत आहेत.