वेळू गावच्या समीक्षा टिळकने मिळवला जिल्हास्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक

0
7

सातारा प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. दरम्यान, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धांतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. समीक्षा दशरथ टिळक हिने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.

कोरेगाव तालुक्यातील वेळू गावातील १३ वर्षीय विद्यार्थिनी समीक्षा टिळक ही सध्या इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. वयाच्या 13 व्या वर्षी समीक्षणे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रस्सीखेच, 4 ×100 रीले, 400 मी धावणे या खेळांमध्ये तालुकास्तरावर प्राविण्य मिळवले आहे. इतकेच नाही तर नुकत्याच झालेल्या वक्तुत्व स्पर्धेत कोरेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील समीक्षाने उत्तम अशी कामगिरी करून दाखविली आहे.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा हिने मिळवलेल्या यशाबद्दल वेळू जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा नेवासे, शिक्षक तुषार गोरे, बजरंग कांबळे, आरती भोसले, जयश्री भोसले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्यांच्या वतीने सत्कार कारण्यात आला.

विद्यार्थ्यांना आम्ही घडविण्याचे काम सर्वांचे : शिक्षक तुषार गोरे

सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हुशार आहेत. त्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील वक्तृत्व गुण ओळखून त्यांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या अनेक स्पर्धांमध्ये देखील उतरण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे. वेळू सारख्या गावात आज जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देशात अनेक ठिकाणी उच्च पदावर प्रशासकीय सेवेत नोकरी करत आहेत. अशांप्रमाणे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची देखील पुढं जाऊन मोठं होण्याची स्वप्ने आहेत. अशा विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम आम्हा शिक्षकांसह सर्वांचे असल्याची प्रतिक्रिया वेळू जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तुषार गोरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.