सातारा प्रतिनिधी । दरवर्षी मराठमोळा सण दसरा हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र,कोल्हापूरचा शाही दसऱ्याचा थाट काही वेगळाच असतो. असाच शाही दसऱ्याचा थाट यंदा सातारकरांना पहायला मिळणार आहे. कोल्हापूरच्या दसरा उत्सवाच्या धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभाग आतापासूनच कामाला लागले आहेत.
यंदाच्या वर्षापासून छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्यातर्फे साजरा होणाऱ्या शाही दसरा सोहळ्यामध्ये शासनाचा सहभाग असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलिस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजित बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सुनील काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.
मिरवणुकीत असणारा ‘या’ गोष्टींचा समावेश
जल मंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पूजनावेळी पोलिस बॅन्ड पथकाने मानवंदना दिली जाणार असून त्यानंतर भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर केला जाणार आहे. यावर मावळ्याच्या पोशाखातील व्यक्ती असणार आहेत. पालखीसोबत समारंभाच्या पोषाखातील पोलिस पथक ठेवले जाईल. साधारणतः दसरा शाही मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक जलमंदिर ते शिवतीर्थ अशी होईल. त्याचबरोबर शाही पोवाड्याचे आयोजन केले जाणार आहे.