सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा विविध नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. नदी, थंड हवेचे ठिकाणे, हिरवेगार डोंगर अशा गोष्टी या जिल्ह्यात असल्याने या माध्यमातून समृद्ध वनसंपदा लाभली असून, हजारो पशू-पक्षी येथे वास्तव्य करतात. ‘हुडेड ग्रासहॉपर’ हा त्यातील एक छोटासा जीव होय. आकर्षक रंगसंगती, पाठीवर उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी, पांढरे डोळे यामुळे ‘हुडेड ग्रासहॉपर’ (Hooded Grasshopper) हा अधिकच सुंदर भासतो. या दुर्मीळ कीटकाचे नुकतेच ठोसेघर परिसरात दर्शन घडले आहे.
हुडेड ग्रासहॉपर हा नाकतोड्या जातीतील सुपर फॅमिलीतील असून, तो दुर्मीळच आहे. त्यामुळे तोही कमी प्रमाणात आढळतो. मात्र, क्वचितच आढळणारा व दृष्टीस पडणारा हुडेड हा नाकतोडा पावसाळ्यात दिसतो. हुडेड ग्रासहॉपर हा एक कीटकवर्गीय प्राणी आहे. पानांशी एकरूप होणारा रंग अन् पाठीवरील उंचावट्यामुळे त्याला इंग्रजीत ‘हुडेड ग्रासहॉपर’ असे नाव ठेवण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव ‘टेराटोड्स मॉन्टिकोलीस’ असून या कुळातील कीटकांना हुडेड ग्रासहॉपर म्हणून ओळखले जाते. हा गवतटोळ्यांचा एक वंश आहे जो भारत आणि श्रीलंका येथे आढळतो.
इंग्लिश प्राणिशास्रज्ञ जॉर्ज रॉबर्ट ग्रे यांनी १८३२ सालात पहिल्यादा शोधून काढला आणि ग्रालाईस मोन्टीकोलाईस, असे त्याचे नामकरण केले. पुन्हा फ्रेंच कीटकशास्रज्ञ गॅस्पेर्ड अँगुस्टे बुल्ले यांनी १८३५ सालात या नाकतोड्याला तेराटुडेस मोन्टीकोलाईस हे नवीन नाव दिलं. तरी देखील तो त्याच्या भरगच्च आवरणामुळे हुडेड ग्रासहॉपर हे त्याच्या टोपन नावामुळेच जास्त ओळखला जातो. हा नाकतोडा ऑर्थोष्टरा या गटामध्ये मोडतो.