सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई; तब्बल 14.62 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

0
203
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मार्च महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा केला आहे.

एप्रिल ते जून दरम्यान जिल्ह्यातील 473 गावे व 657 वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते. यासाठी 14 कोटी 62 लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली होती. पश्चिम भागात पावसाच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी पूर्व भागात कमी प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने तलाव, विहीरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होवू लागली आहे. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात बागायती क्षेत्र वाढल्याने पिकांना पाणी देण्यासाठी उपसाही वाढला आहे त्यामुळे पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. कडक उन्हाळा असल्याने टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

414 टँकर अन् 200 विहिरींचे अधिग्रहण

माण तालुक्यात 93 टँकर व 25 विहिरी, खटावमध्ये 21 टँकर व 20 विहिरी, कोरेगाव 108 टँकर व 51 विहिरी, खंडाळ्यात 7 टँकर व 2 विहिरी, फलटणमध्ये 47 टँकर व 12 विहिरी, वाईत 29 टँकर व 40 विहिरी, पाटणमध्ये 69 टँकर, जावलीत 15 टँकर व 28 विहिरी, महाबळेश्वरमध्ये 16 टँकर व 4 विहिरी, कराडमध्ये 9 टँकर व 18 विहिरी असे मिळून 414 टँकर व 200 विहीरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. याचबरोबर कोरेगाव तालुक्यात 139 गावे व 13 वाड्या, खटाव 32 गावे व 33 वाड्या, खंडाळा 6 गावे, फलटण 58 गावे, जावली 33 गावे व 14 वाड्या, महाबळेश्वर 13 गावे व 7 वाड्या, कराड 23 गावे, पाटण 58 गावे व 33 वाड्यात टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे.

असा केला जाणार खर्च…

पुढील तीन महिन्यात सर्वाधिक टंचाई माण तालुक्याला जाणवणार आहे. 89 गावे व 532 वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते. या टंचाई निवारणासाठी 8 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोरेगाव तालुक्यात 2 कोटी 7 लाख पाटण 1 कोटी 21 लाख रुपये, खटाव तालुक्यात 34 लाख रुपये, खंडाळा तालुक्यात 7 लाख रुपये, फलटण तालुक्यात 86 लाख 57 हजार रुपये, वाई तालुक्यात 65 लाख 15 हजार रुपये, जावली तालुक्यात 36 लाख रुपये तर कराड तालुक्यात 14 लाख 58 हजार रुपये, महाबळेश्वर तालुक्यात 29 लाख 44 हजार रुपये टंचाईवर खर्च होण्याचा अंदाज आहे.