सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील वडजल येथील हॉटेल स्वराज किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागून रोख रकमेसह दुकानातील इतर साहित्य जळून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील वडजल येथील निखिल सुभाष काटकर यांनी शेतीला जोड धंदा म्हणून हॉटेल जनरल स्टोअर्स हा व्यवसाय वडजल येथे म्हसवड- मायणी रस्त्यावरील एसटी बस स्थानकाशेजारी सुरू केला आहे.
सोमवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास सदर दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली व आगीमध्ये दुकानात ठेवलेले शेतातील कांदा विक्रीचे एक लाख वीस हजार रुपये व रोख रक्कम तीस हजार रुपये असे दीड लाख रुपये व दुकानातील
फ्रिज, कपाट, साखर, सोयाबीन तेल, तांदूळ, इलेक्ट्रिक, साहित्य चपलांचे ८९३ जोड, केक व इतर सुमारे साडेतीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
या घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाठी श्रीमती काटरे यांनी केला असून, निखिल काटकर हे शेतीला जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. या नुकसानीमुळे काटकर कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे. रात्रीच्या सुमारास दुकानाला आग लागल्यामुळे त्यांना कसलीही चाहूल लागली नाही. सकाळी उठून दुकान उघडले असता दुकानातील साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गाव कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा केला आहे. शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी निखिल काटकर यांनी केली आहे.