कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर मलकापूर गावच्या हद्दीत शिवशाही बसची अज्ञात वाहनाला धडक होऊन झालेल्या अपघातात बसच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन दोन्ही लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
कराड व मलकापूर गावच्या हद्दीत सुमारे साडेतीन किलोमीटर लांब उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आलेली आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. सहापदरीकरणाच्या कामामुळे अगोदरच अरुंद रस्ता व त्यातच वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी होत असते.
दरम्यान, बुधवार, दि. 25 रोजी कोल्हापूर बाजूला जाणार्या शिवशाही बसची अचानक समोरील वाहनाला धडक झाली. या अपघातात बसच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. तर समोर ज्या वाहनाला बसची धडक बसली ते वाहन तसेच पुढे निघून गेले. अपघातानंतर शिवशाही बस महामार्गावरच उभा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. अगोदरच अरुंद रस्ता त्यात शिवशाही बस बंद पडल्याने इतर वाहनांना पुढे जाताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.
क्रेनच्या सहाय्याने शिवशाही बस बाजूला घेईपर्यंत दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचार्यांसह महामार्ग पोलिस व कराड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रयत्न करत होते. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळ नाराजी व्यक्त केली जात आहे.