पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यात शिवशाही गाडीने घेतला पेट; प्रवासी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील वाढेफाटा हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यावेळी गाडीतून २१ जण प्रवास करत होते. चालक – वाहकांने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची (एमएच ०६ बीडब्ल्यू ३७२२) स्वारगेट-सांगली ही शिवशाही बस पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गवरून सांगलीकडे निघाली होती. ती दुपारी पावणेदोनच्या सुमारास साताऱ्यातील वाढे फाटा येथे आली असता गाडीतून धूर येऊ लागला. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून चालक-वाहकांना प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले. तोपर्यंत गाडीने रौद्ररुप धारण केले होते. महामार्गावर आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. तर आसमंतात काळ्या धुराचे लोट उसळले होते.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक वळविली. घटनेची माहिती मिळताच महामंडळाच्या सातारा विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रवाशांना अन्य वाहनातून पुढे पाठविण्यात आले. यंत्रअभियंता विकास माने आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.