कराड प्रतिनिधी । रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून, हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदे यांचे सैन्य भाडोत्री आहे. आणि भाजपलाही अशा बाहेरून गद्दार मुख्यमंत्र्यांना घ्यावं लागतंय, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपवर केली.
शिवसेना खासदार संजय राउत यांनी कराड येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेली ते म्हणाले की, महाविकास आघाडी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विरोधकांची सत्ता उलटवून टाकण्यासाठी जे – जे करावे लागेल, ते सर्व करणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे भाडोत्री सैन्य राज्य कारभार करत आहे. भाडोत्री हे कोणाचेच नसतात आणि ते बाजारभुंनगे आहेत.
बावनकुळेंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या बैठकीवर टीका केली आहे. बावनकुळे यांच्या या टीकेचा राऊत यांनी कराड दौऱ्यावेळी चांगलाच समाचार घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे झोपेत आहेत. अजून त्यांनी नीट डोळे उघडले नाहीत. त्यांचा चेहरा नीट पाहा. आताच झोपेतून उठलेत असं तुम्हाला कायम दिसेल किंवा पापण्या हलवत आहेत, असं दिसेल. अशा माणसाकडून काय अपेक्षा करत आहात? त्यांना काय देश कळतोय? विधानसभेत त्यांना तिकीट नाकारलं होतं. अनेक काळ ते वनवासात होते. त्या धक्क्यातून ते सावरलेत का माहीत नाहीअसे राऊत यांनी म्हंटले.