सातारा प्रतिनिधी | राज्यात महायुतीतील नेत्यांना देण्यात आलेल्या पालकमंत्रिपदावरुन चांगलीच नाराजी समोर येताना दिसत आहे. यामध्ये खास करून सातारा जिल्ह्यात नाराजी असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच पालकमंत्रीपद हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकानी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालिका कांचन साळुंखे यांनी नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्री पद द्या, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी शंभूराज देसाई यांना मिळालेल्या पालकमंत्री पदाबाबत नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला जर स्थगिती मिळू शकते तर साताऱ्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती का मिळू शकत नाही. असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना कांचन साळुंखे म्हणाल्या, सरकारने सातारा जिल्ह्यासाठी जाहीर केलेलं पालकमंत्री पद हे सातारा जिल्ह्यातील नागरिकांना मान्य नाही. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे आहेत, तो निकष जर लावण्यात आलेला आहे, तर त्या निकषांच्या आणि संख्येच्या आधारे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्री पद दिले गेले पाहिजे, अशी सर्व जनतेची मागणी आहे.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आणि तशा पद्धतीने इथे साताऱ्याच्या देखील पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी आणि शिवेंद्रराजे भोसले यांना इथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद सन्मानाने द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारने राखावा अशी आमची रास्त भूमिका आहे, ही मांडण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.