टिपू सुलतानच्या तलवारीवर आक्षेप नाही मग वाघनखांवर का?; शिंवेंद्राराजेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा वध केला, या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. गणेशोत्सवात या प्रसंगावरील देखाव्यावर कुणी आक्षेप घेऊ नये. विजय मल्ल्याने इंग्लंडमधून टिपू सुलतानच्या तलवारीची खरेदी करून ती भारतात आणली. त्यावर कुठल्या इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, छ. शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी इतिहास घडवला, त्याबाबत का शंका घेतल्या जातात?असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले पत्रकार परिषदेत केला.

सातार्‍यात इंग्लंडहून 19 जुलैला शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल होत आहेत. त्यानिमित्त आयोजित आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैयशील कदम प्रमुख उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात पहिल्यांदाच ऐतिहासिक वाघनखे येत आहेत. वाघनखांची संग्रहालयापर्यंत मिरवणूक निघायला हवी. त्यामुळे शिवप्रेमी, इतिहास तज्ज्ञ, सर्वसामान्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल. या ऐतिहासिक वस्तूचे पावित्र राखायला हवे. मिरवणुकीसारख्या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. संग्रहालयात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मिरवणुकीत झांज पथक, स्वागत कमानी, भगवी कणाद, छ. शिवाजी महाराज पुतळा, विद्युत रोषणाई करता येईल.

आदी मान्यवर असणार उपस्थित…

सातार्‍यात ऐतिहासिक वाघनखे येणार असल्याने याचा प्रसार करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. संग्रहालयात नाणी, मुद्रा, हत्यारे आदी ऐतिहासिक ठेवा माहिती फलकासह प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहे.

अशी आहे कार्यक्रमाची व्यवस्था…

ऐतिहासिक क्षण सातारकर, इतिहासप्रेमींना पाहता यावा, यासाठी जिल्हा परिषद हॉल व शहरात ठिकठिकाणी एलईडी स्क्रीनची सोय केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद बहुद्देशीय सभागृहात सकाळी 11 वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरू असेल. या कार्यक्रमात ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. या कार्यक्रमासाठी 700 लोकांना पास दिले जाणार आहेत. 20 जुलैपासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 यादरम्यान संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. एकावेळी 200 लोकांना संग्रहालयात सोडण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्यानंतर महिला बचत गट, शेतकर्‍यांना शासनाच्यावतीने संग्रहालय पाहण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर लोकांसाठी प्रत्येक दिवशी 30 स्लॉट तिकीट विक्रीनुसार उपलब्ध होतील. तिकीट ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध असतील. ही वाघ नखे 7 महिने सातार्‍यात राहणार आहेत.