सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या राड्यात दंगलीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रक काढून प्रतिक्रिया दिली आहे. “सातारा जिल्ह्यात अतिशय अशोभनीय व निंदनीय घटना घडली आहे. सातारकरांसाठी सध्या कसोटीचा काळ असून, या कठीण प्रसंगात डगमगून न जाता सामाजिक सलोखा व ऐक्याची भूमिका घेऊन आपण शांतीच्या मार्गाने वाटचाल करूया. सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण न करत जातीय सलोखा व ऐक्य अबाधित ठेवावे,” असे आवाहन भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले की, सातारा ही शूरांची, वीरांची तसेच शांत व संयमी लोकांची भूमी आहे. जिल्ह्याला एक वैभवशाली सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे. कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार आजवर जिल्ह्यात यापूर्वी घडलेले नाहीत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात अतिशय अशोभनीय व निंदनीय घटना घडली आहे; परंतु या सर्वातून पुढे जाताना आपण सर्वांनी शांती, सलोखा व सहिष्णुता अबाधित ठेवायची आहे. समाजात शांतता प्रस्थापित करण्याचा व असुरक्षित वातावरण निवळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
सातारकरांच्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा काळ आहे. या कठीण प्रसंगात डगमगून न जाता सामाजिक सलोखा व ऐक्याची भूमिका घेऊन आपण शांतीच्या मार्गाने वाटचाल करत राहूया. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाज माध्यमात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित न करता, तसेच धार्मिक तेढ निर्माण न करता जातीय सलोखा ठेवावा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी केले आहे.