सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विकासकामावरून व पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून आता साताऱ्यातील दोन्ही राजे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, खा. उदयनराजे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत सातारा नगरपालिकेत पूर्वी आणि आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांची ईडीची चौकशी लावावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आ. शिवेद्रराजेंनी त्यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. सातारा नगरपालिकेतील भ्रष्टाचार लोकं उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. उदयनराजेंनी नेहमीचे डायलॉग बदलून सातारकरांसाठी काहीतरी करावे. सातारा पालिकेत ज्यांची ज्यांची सत्ता होती, त्या कारभाराची ईडी चौकशीची मागणी करून खा. उदयनराजेंनी नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला हे एकप्रकारे मान्यच केले आहे, असे विधान आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा येथे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सातारा पालिकेची ईडी चौकशी व्हावी यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र द्यावे. राज्यसभेचे ते खासदार असल्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा दिल्लीला जाणे सोपे आहे. सातारा विकास आघाडीने केलेल्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलत आहोत. सातारकरही जे बघत आहेत ती वस्तुस्थिती आहे. सातारा पालिकेत भ्रष्टाचार झाला हे उदयनराजेंनीही मान्य केले आहे.
आम्ही समोरासमोर राहत आहोत. त्यांनी घरातून उठून माझ्याकडे यावे. सारखं काय समोरा समोर या, मैदानात या म्हणता. उदयनराजेंनी डायलॉग बदलावेत. सातारकरांसाठी काही तरी करा. सारखं समोरासमोर या हे बस्स झालं, असा सल्ला यावेळी आ. शिवेंद्रराजेंनी दिला. आता शिवेद्रराजेंच्या या सल्ल्याला खा. उदयनराजे नेमकं काय उत्तर देतायत हे पाहावं लागणार आहे.