रुग्णालयात जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले; मी भाजपचा आमदार असलो तरी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. दरम्यान, सभेनंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी “मी भाजप पक्षाचा आमदार असलो तरी, नागपूर अधिवेशनात पहिला विषय मी मांडला होता,” असे म्हंटले.

साताऱ्यात आज दुपारी सभेदरम्यान प्रकृती खालवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालय गाठून जरांगे पाटील यांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या साताऱ्यातील दौऱ्यात जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली हे कळाल्यावर मी त्यांना भेटलो आहे. त्यांना तब्बेतीची काळजी घेण्याची विनंती केली. ही लढाई मोठी आहे, समाज तुमच्या पाठीशी आहे. तब्बेत चांगली ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. उद्याचा दौरा पार पाडण्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आम्ही सगळे त्यांना जी मदत आणि सहकार्य लागेल ती करायला तयार आहोत. लवकरच त्यांची तब्बेत चांगली व्हावी ही अपेक्षा आहे.

मी भाजप पक्षाचा आमदार असलो तरी, नागपूर अधिवेशनात पहिला विषय मी मांडला होता. पक्षाच्या माध्यमातून गरजू मराठ्यांना आरक्षण मिळावे आणि ते कोर्टात टिकावे अशी आमची अपेक्षा आहे. उमेदवार उभं करणं किंवा पाडणे हा त्यांचा निर्णय आहे. कुणाचे काढून न घेता ज्यांना गरज आहे अशांना आरक्षण दिले पाहिजे आणि टिकले पाहिजे असं दिले पाहिजे, असे आमचे मत असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.