शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 30 फूट उंचीचा पुतळा बसवण्यात येणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

0
570
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 30 फूट उंचीचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी चौथरा नव्याने तयार करण्यात येणार असून सातारा पालिकेने या कामासाठी 2 कोटींची तरतूद केली आहे. पुतळ्याचे स्वरूप तसेच ठेवण्यात येणार आहे. मात्र आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतील. मूर्तीकार ठरवावा लागेल. स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. दिल्लीतील मूर्तीकारांसोबत संपर्क साधला जाणार आहे. हा पुतळा ब्राँझ धातूमध्ये तयार करण्यात येणार आहे. जुना पुतळा अजिंक्यतारा किल्ल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विनोद कुलकर्णी, विनीत कुबेर, अविनाश कदम, अमित कुलकर्णी, अमोल मोहिते, राजू गोरे, रवी माने, शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शिवजयंती महाराष्ट्रासह देशात दणक्यात साजरी होणार आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील पहिले शिवसाहित्य संमेलन दि. 17 रोजी होणार असून त्याचे उद्घाटन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे. या संमेलनात स्वराज्यात योगदान देणार्‍या विविध जातीतील महापुरूषांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 18 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गडपूजन, सायंकाळी 7 वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. लोकांच्या आग्रहाखातर केरळचे 100 कलाकार केरळी वाद्यांसह शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. सातारकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे. रात्री 9 वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांची महाआरती होणार आहे.

शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, समाधी स्थळाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे पुढे काम होऊ शकले नाही. किल्ल्यांकडे जाणार्‍या रस्त्यांबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, किल्ल्यांवर धार्मिक स्थळे असून अशा किल्ल्यांकडे जाणार्‍या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. काँक्रीट रस्त्यांना प्राधान्य राहील. टप्प्याटप्प्याने हे रस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टीबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, किल्ल्याकडे जाणार्‍या मार्गाचे काम झाले आहे. पदपथाचे काम सुरू आहे. बुरूज दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी आराखडा तयार केला आहे. राजसदरेचे काम शिवकालीन पद्धतीने करण्यात येणार आहे. तटबंदीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून 5 कोटींचा निधी उपलब्ध केला असून आणखी कामे प्रस्तावित आहेत. अफजलखानाची कबर पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार का? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्हा प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत. धार्मिक विधीनुसार त्याठिकाणी फक्त पूजा होते. भावना दुखवल्या जाऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी मनाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.