सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी काल भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. भाजपासून त्यांची घोषणा झाली असली तरी त्यांच्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? जिल्ह्यात कुणाची ताकद किती? याची देखील चर्चा सुरु झाली आहे. या दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी “लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार हा भाजपचाच होणार आहे. या जिल्ह्यात भाजपची ताकद ही पहिल्यापेक्षा अधिक वाढली असल्याचे म्हंटले आहे.
भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून सातारची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना अधिकृतपणे जाहीर झाली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील माझ्या विधानसभा मतदार संघात भाजपची जी ताकद आहे. ती ताकद आम्ही पूर्णपणे पणाला लावू. आमच्या भाजप आणि महायुतीचा उमेदवार हा निवडूनच आला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेहि वेगळी काही अशी परिस्थिती या विधानसभा मतदार संघात निर्माण होणार नसल्याची खात्री आहे.
लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हारणार याबाबत जे काही सर्वे झाले आहेत. त्याबद्दल मला काहीच सांगायचे नाही. निवडणूक म्हटलं कि शेवटी राजकारण आहे. इकडे तिकडे होत असले हि वस्तुस्थिती आहे. राजकारणातील जे काही डावपेच आहेत ते सगळे वापरायला लागतात. शेवटी आपण म्हणतो ना कि राजकारणात साम, दाम, दंड आणि भेद हे सर्व वापरायला लागते. हि राजकारणाची पद्धत आहे हे काही नवीन नाही. अशात उमेदवार म्हणून उदयनराजे स्वतः लोकांपर्यंत पोहचताहेत आम्हीही लोकांमध्ये जात आहोत. या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले.