सातारा प्रतिनिधी | सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने रविवारी शाही मशिदमध्ये आयोजित केलेल्या मशिद परिचय उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सहभाग नोंदवला. यानंतर त्यांनाही मशिद व त्या ठिकाणच्या नित्यक्रमाची माहिती देण्यात आली.
सांप्रदायिक सद्भावना जोपासली जावी, स्नेहभाव वाढीस लागावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता. यासाठी शाही मशिदची निवड करत त्याठिकाणी रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत भेट देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. यानुसार सकाळी दहा वाजता या उपक्रमास सुरुवात झाली. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करत त्यांना मशिदची ठेवण, त्याठिकाणी होणाऱ्या नित्यक्रमाची माहिती देण्यात येत होती. यामध्ये अजानचा अर्थ काय, मशिदचे महत्त्व काय, मशिदमध्ये प्रार्थना कशी करतात? आदींचा समावेश होता.
दुपारी दोनपर्यंत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासह अनेक सातारकरांनी सहभाग नोंदवत माहिती जाणून घेतली. हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी यावेळी बैतुलमाल कमिटी तसेच मुस्लिम बांधवांचे आभार मानले.