सातारा । साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निमित्त ठरले आहे ते म्हणजे सातारा बाजार समितीच्या नविन इमारत भूमिपूजनाचे…. आज या जागेच भूमिपूजन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होत, परंतु त्यापूर्वीच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी हा भूमिपूजन कार्यक्रम उधळून लावला आहे. त्यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं.
सातारा बाजार समितीत आ. शिवेंद्रराजे गटाची सत्ता आल्यानंतर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी खिंडवाडी येथे साडे १५ एकरवर बाजार समितीची नवी इमारत उभारण्यात येणार आहे. आज त्याचा भूमिपूजन सोहळा सकाळी 10 वाजता आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होता . त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु असतानाच उदयनराजे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसोबत याठिकाणी आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच त्याठिकाणी असलेला कंटेनर पलटी करण्यात आला. या घटनेनंतर काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळालं.
या सर्व राड्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, मात्र हि जागा माझ्या मालकीची आहे, माझ्या जागेत शेड असल्याने ते माझेच आहे, त्यामुळे माझे शेड मी तोडले तर तुम्हांला काय प्रॉब्लेम आहे असा सवाल उदयनराजेंनी पोलिसाना केला. माझ्या जागेत एखाद्याने काही केले तर ती वस्तू कायद्याने माझीच होणार आहे असेही ते म्हणाले. या सर्व घडामोडींमुळे साताऱ्यात पुन्हा एकदा दोन्ही राजेंमध्ये वाद पेटल्याचे चित्र सातारकरांनी अनुभवलं