‘लोकशाहिरां’च्या भारतरत्न पुरस्काराची शिवेंद्रसिंहराजेंची फडणवीसांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुंबई येथे भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दलित साहित्याचे संस्थापक असलेल्या लोकशाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाची भूमिका बजावली आहे. अशा या थोर समाजकारणी, लोकहितवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावेळी आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, फिरोज पठाण, सचिन कांबळे, सोमनाथ पाटोळे, उमेश खंडुझोडे, जनार्दन घाडगे गुरुजी, श्रीकांत कांबळे, माधव साठे, राजू सकटे आदी उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. अण्णाभाऊ साठे यांनी परिवर्तन आणि जनजागृती करताना स्वतःला समाजासाठी वाहून घेतले होते. अशा या महान साहित्यिकाला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी सकल मातंग समाजाची आणि तमाम मराठी जनतेची आहे.

त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत सकारत्मक प्रतिसाद देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी दिले.