सातारा प्रतिनिधी | भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय खलबते झाली. अनेक वर्षानंतर आ.शिवेंद्रराजे भोसले जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सातारच्या राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू आहे. या भेटीत बाबाराजेंनी उदयनराजेंना त्यांच्या आवडीचं कॅडबरी चॉकलेटही दिलं.
आमदार शिवेंद्रराजे भोसले हे काही दिवसापूर्वी आजारी होते. त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुचीवर गेले होते. मात्र, दोघांची भेट झाली नव्हती. त्यामुळे आज शिवेंद्रसिंहराजे भोसले उदयनराजेंना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेसमध्ये गेले होते. यावेळी तब्येतीची विचारपूस तर झालीच, त्याच बरोबर दोन्ही राजे बंधूंमध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे राजे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदारकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केल्याची चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली आहे. विरोधकांनी देखील या दोन्ही राजेंच्या भेटीची चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसून येत आहे. काही वर्षापासून दोन्ही राजेंमध्ये राजकीय वैरत्व होतं. त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणे-येणे दोन्ही राजेंनी बंद केले होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांचे मनोमिलन झाल्याने आता त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले आहे.