सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती, तसेच सातारा पालिकेच्या वतीने राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांचा भाग असणाऱ्या मिरवणुकीत सोमवारी सायंकाळी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामुळे शिवकाळ अवतरल्याचा भास निर्माण झाला होता.
सातारा येथे गेल्या दोन दिवसांपासून रक्तदान शिबिर, परिसंवादासह इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवराज्याभिषेक दिन समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी याच अनुषंगाने शाही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीची सुरुवात राजवाडा येथील गांधी मैदान परिसरातून झाली. मिरवणुकीवेळी समितीचे विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार हरिश पाटणे, माजी अध्यक्ष अशोक मोने, माजी नगरसेवक अमोल मोहिते, श्रीकांत आंबेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ प्रतिमेचा समावेश करण्यात आला होता. या मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी मर्दानी खेळांचे जोरदार सादरीकरण युवकांकडून करण्यात आले. या सादरीकरणास सातारकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
कराडला प्रतीकात्मक शिवमूर्तीस अभिषेक
ढोल-ताशांच्या गजरात येथे ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने झाला. प्रारंभी दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वेदमंत्रांच्या गजरात प्रतिकात्मक शिवमूर्तीचा अभिषेक करण्यात आला. या वेळी झालेल्या शिवघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.