सातारकर अनुभवणार शिवराज्याभिषेक सोहळा, केरळचे वाद्य ठरणार आकर्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने ऐतिहासिक शाहूनगरीत दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

शिवजयंती महोत्सवामध्ये शनिवारी (दि. १७ ) सायंकाळी ५ वाजता राजवाड्यासमोरील गांधी मैदान महाराष्ट्राचे शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत ख्यातनाम, प्रसिद्ध कलाकार नंदेश उमप निर्मित ‘शिव सोहळा’ हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत शिवरायांच्या सर्व ऐतिहासिक घटना आणि पराक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

शनिवारी ‘जाणता राजा’ या कर्यक्रमानंतर साताऱ्यात प्रथमच घोडे आणि १०० कलाकारांचा सहभाग असलेला भव्यदिव्य असा ‘शिव सोहळा’ हा कर्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. १८) सायंकाळी ५ वाजता किल्ले अजिंक्यतारा येथे भव्य मशाल महोत्सव होणार असून हजारो मशालींनी किल्ले अजिंक्यतारा उजळून निघणार आहे. सातारकरांनी आपला सहभाग नोंदवून ‘एक मशाल माझ्या राजासाठी स्वतः लावूया’, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजेंनी समितीच्या वतीने तमाम सातारकरांना केले आहे.

या महोत्सवात सुनिल बापू लाड (कवलापूर) सांगली यांचे व्याख्यान होणार असून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सातारा शहरातील काही संस्था व व्यक्ती यांचा सन्मान केला जाणार आहे. सोमवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथून भव्य शिव मिरवणूक निघणार आहे. केरळमधील १०० कलाकारांचा सहभाग असलेले प्रसिद्ध वाद्य पथक हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे. या शाही मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट यासह ऐतिहासिक देखावे असणार आहेत. या मिरवणुकीचा समारोप पोवई नाका येथे होणार असून रात्री ८.३० वाजता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांची आरती तसेच फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी होणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रराजेंनी दिली आहे.