लग्न म्हंटल कि, सनई चौघडे आले, ब्राह्मण आले, विधी, शुभमुहूर्त आला आणि धुमधडाका आला.. आपल्या हिंदू धर्मात अशाच पद्धतीने लग्न केलं जाते आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन दिल जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक आगळावेगळा शिव विवाहसोहळा (Shiv Vivah In Karad) पार पडला आहे. किरण आणि शिवानी असं सदर वर- वधूचे नाव असून त्यांच्या लग्नात ना ब्राह्मण होते, ना त्यांनी काढलेला मुहूर्त… ना अक्षता … तर हिंदूंचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनाच डोळ्यासमोर ठेऊन हा शिव विवाहसोहळा पार पडला. त्यामुळे या अनोख्या लग्नाची गोष्ट संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
मूळचे सदाशिवगड आणि सध्या गोवारे येथील गजानन हौसिंग सोसायटी येथे राहणारे शिवराज बाबासाहेब माने यांची कन्या आणि वडगाव हवेली येथील माणिक बाबुराव चव्हाण यांचे सुपुत्र किरण यांचा शिवविवाह शिवराज्याभिषेक शके ३५० शनिवारी १३ एप्रिल रोजी जनार्दन लॉन्स येथे अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी वधू-वराने अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊमाता, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि दीपप्रज्वलन केले. भारतीय संविधानाचे पूजन यावेळी करण्यात आले. त्यानंतर कोणताही धार्मिक विधी, अक्षता वाटप न करता थेट एकमेकांना हार घातला आणि हा शिवविवाह सोहळा पार पडला. बदलत्या काळात समाज प्रबोधनाचा विचार आणि प्रत्यय या शिवविवाहामुळे आला. महत्वाची बाब म्हणजे महिलांना समाजात आदराचे स्थान आणि त्यांच्या सन्मानाच्या पार्शवभूमीवर वर किरणने वधू शिवानीला नेहमीच्या डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला स्थान दिले आणि समाजाला नवा संदेश दिला. यावेळी उपस्थित लोकांनी या अनोख्या लग्नाचे स्वागत केलं आणि नवं वधू-वराला आशीर्वाद दिले.
कराडात पार पडला अनोखा शिवविवाह!! ना विधी, ना भटजी, ना अक्षता.. pic.twitter.com/dyH9Drn4ye
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2024
दरम्यान, शिवानीचे वडील शिवराज माने हे निवृत्त पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. सध्या ते रोटरी क्लब कराडचे सचिव, भारतीय युवा ट्रस्टचे मार्गदर्शक असून त्यांचे संपूर्ण कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आहे . या अनोख्या शिवविवाहाला छत्रपती शिवरायांचे सरसेनापती तळबीडचे हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते, तहसीलदार विजय पवार, सामाजिक- शैक्षणिक मान्यवरांची उपस्थिती होती.