‘उबाठा’ची शिवसेना जिल्हयातील आनेवाडी टोलनाक्यावर करणार आंदोलन…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावरील टोल वसुलीच्या मुद्यावरून सातारा जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी उबाठा गटाचे पदाधिकारी सोमवार दि. 15 रोजी आनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत टोलमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.

यासंदर्भात उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आज पत्रकारपरिषदेत भूमिका मांडली. मोहिते म्हणाले, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील वाहनांना त्यांच्या परिसरातील टोलनाक्यावर टोलमाफी दिली आहे. पण सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांना आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर टोल भरावा लागत आहे. हा सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांवर अन्याय आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना दोन्ही टोलनाक्यांवर टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी येत्या १५ जानेवारीला उद्धव ठाकरे गट शिवसेना आनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करून धरणे आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातील दोन टोलनाक्यांवर सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर सेवा रस्ते नाहीत.

कारण नसतानाही अनावश्यक बोगदे काढले आहेत. टोलनाक्याच्या परिसरातील पाच ते १५ किलाेमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारला जाऊ नये, असा नियम आहे.  जिल्ह्यात दोन टोलनाक्यांवर स्थानिकांना पूर्ण टोलमाफी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, निवेदन देऊनही त्यांनी कोणतीही बैठक लावली नाही. त्यामुळे या टोलमाफी आंदोलनात सातारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन मोहिते यांनी केले आहे