सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. शहरात पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. यानंतर पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
सोमवारी सकाळी ब्रह्मवृंद्धांच्या मंत्रपठणानंतर जलाभिषेक विधी पार पडला. यावेळी दमयंतीराजे भोसले यांनी पाच नद्यांच्या पाण्यांनी विधिवत पद्धतीने छत्रपतींच्या पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घातला. शिवज्योतीचे पूजन करून छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या शंभर फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या अनावरणानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी..जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला.
ठीक सकाळी सव्वानऊ वाजता शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गगनभेदी जयघोष देत युगपुरुषाला अभिवादन करण्यात आले. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी सकाळपासूनच पोवई नाक्यावर गर्दी केली होती. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक निशांत पाटील, वसंत लेवे, प्रशांत आहेरराव, माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, सुनील काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.