सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक इतिहास अभ्यासकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक ठेव्याचे संशोधन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख दक्षिण दिग्विजयाचे इतिहास अभ्यासक अनिकेत वाघ, कुमार गुरव यांच्यासह अभ्यासकांनी शोधून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख तामिळनाडूतील भूमीत प्रकाशात आला आहे.
विल्लूपुरम जिल्ह्यातील तिरुवामत्तुर या गावातील अभिरामेश्वर मंदिराचा शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केल्याची नोंद या शिलालेखात आढळते. शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचा बलाढ्य किल्ला जिंकला. यानंतर जिंजीच्या दक्षिणेला असलेल्या तिरुवाडी याठिकाणी मराठे आणि शेरखान लोधी यांची लढाई झाली. तिरुवामात्तुर हे गाव याच मार्गावर येत असून, येथे बंद असलेल्या शिव मंदिरात हा शिलालेख आढळला आहे. हा शिलालेख ओवीबद्ध असून, छत्रपती शब्दाचा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. पंपा नदीकिनारी असलेल्या अभिरामेश्वर मंदिराच्या पहिल्या सभामंडपात शिलालेखाचे दोन तुकडे बसविण्यात आले आहेत.
एकाच शिळेचे हे दोन तुकडे असून, एकूण ११ ओळींचा शिलालेख आहे. हा कोरीव शिलालेख देवनागरी लिपी व मराठी भाषेत आहे. या कार्यात तामिळनाडू येथील प्रो. डॉ. रमेश, अथर्व पिंगळे यांचे सहकार्य मिळाले. दक्षिण दिग्विजयाचे इतिहास अभ्यासक अनिकेत वाघ, कुमार गुरव, शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने, सौरभ जाधव यांनी या शिलालेखाचे संशोधन केले असून, लिप्यांतर अनिल दुधाने आणि वाचन के. एन. दीक्षित यांनी केले आहे.
शिलालेख काय सांगतो पंबा नदीच्या किनारी जिथे वन्नि वृक्षाचे (औषधी वनस्पती) जंगल आहे, अशा तिरुवामत्तुर गावामध्ये अभिरामेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित दक्षिण दिग्विजय मोहिमेत असताना या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या मंदिरातील प्रमुख मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली व मोठा उत्सव सुरू केला.