सातारा प्रतिनिधी । गरिबांना अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यभरात शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) सुरू करण्यात आली. या थाळीमुळे सातारा जिल्ह्यातील १४०० जणांचा एकवेळच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. खिशातील असलेल्या दहा रुपयाच्या नोटेमध्ये देखील पोटभर जेवण केले जात आहे.
राज्यात कुणीही उपाशीपोटी राहू नये या मुख्य उद्देश्याने गरिबांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून दि. २६ जानेवारी २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारने ‘शिवभोजन थाळी योजना’ सुरु केली. सरकार गेलं तरी महायुती सरकार सत्तारुढ झाल्यानंतरही सुरू आहे. या योजनेंतर्गत गरजू लोकांना आजही दहा रुपयात जेवण मिळत असल्याने खिशात पैसे नसले तरी किमान एकवेळच्या जेवणाचा प्रश्न सुटत आहे.
राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी एकूण १७ केंद्र असून, काही नगरपालिकांच्या हद्दीत तर काही ग्रामीण भागात आहेत. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था महिला बचतगट हॉटेल चालक आदींना चालविण्यासाठी देण्यात आली आहेत. या केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. जिल्हा पुरवठा विभागाकडून या योजनेतर नियंत्रण ठेवले जात आहे.
केंद्र चालकांना दरमहा मिळतेय ‘इतके’ अनुदान
भोजनालय चालविण्यासाठी गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असेल, अशा ठिकाणी या थाळीची विक्री करण्याच्या सूचना आहेत. ग्रामीण भागातील केंद्र चालकांना एका थाळीमागे २५ रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येत होते. विशेष म्हणजे हे अनुदान दर महिन्याला देण्यात येते.
२७ नोव्हेंबरला नवीन कार्यपद्धतीही कार्यान्वित
दि. २७ नोव्हेंबरला नवीन कार्यपद्धतीही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र चालकाने दर १५ दिवसांची देयके तहसील कार्यालयात सादर करायची आहेत आणि दिलेल्या सूचनांनुसार परिपूर्तता करायची आहे. जिल्ह्यात १७ केंद्र असून, काही नगरपालिकांच्या हद्दीत तर काही ग्रामीण भागात आहेत.
असा आहे शिवभोजनचा मेन्यू
शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भाताची मूद आणि वरणाचा समावेश असतो. केंद्र चालकांकडून दररोज भाजी बदलून जेवणात नाविन्य टिकवून ठेवणे, स्वच्छता व टापटीप ठेवण्याकडे लक्ष दिले जात आहे.