सातारा प्रतिनिधी । रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शिंदेवाडी, ता. खंडाळा येथील कंपनीतून ॲल्युमिनियम साहित्याची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचे ॲल्युमिनियम सेक्शनचे साहित्य व ४ लाख रुपयांची महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
लखन सुरेश अवचिते रा. (गणेशनगर मोशी ता. हवेली जि. पुणे) व अशांक विलास खिल्लारे (रा. शांतीनगर भोसरी) यांना पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ३ जुलै रोजी रात्री १२.३० ते मध्यरात्री ४ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी ता. खंडाळा गावचे हद्दीत अॅशबी इंडस्ट्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील उघडे दरवाज्यातून आत प्रवेश करुन कंपनीमध्ये असलेले एकूण १ लाख ९० हजार ८९० रुपये किमतीचे ७०७ किलो वजनाचे अॅल्युमिनीअम सेक्शनचे साहित्य चोरुन नेले होते. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखत शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. तसेच आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे मुख्य आरोपीचा शोध घेतला. सदर दोघे आरोपी हे मोशी ता. हवेली तसेच भोसरी पुणे परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक अब्दुल हादी बिद्री यांच्या नेतृत्वाखाली पो. ना. प्रशांत धुमाळ व पो. कॉ. मंगेश मोझर असे पथक पुणे येथे रवाना झाले.
दरम्यान, पथकाने गुन्ह्यातील आरोपी लखन सुरेश अवचिते व अशांक विलास खिल्लारे यांना भोसरी पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेत अटक केली. गुन्ह्यात आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून एकुण २ लाख ३० हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियम सेक्शनचे मटेरिअल व ४ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिक-अप गाडी असा एकूण ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहूल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरिक्षक सतिश आंदेलवार, अब्दुल हादी विद्री, सफो. अनिल बारेला पोलीस हवालदार सचिन बीर, जितेंद्र शिंदे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मोझर, अजित बोराटे यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला. सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख व बापु बांगर, राहूल धस यांनी अभिनंदन केले.