डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून 1 कोटींची मागितली खंडणी; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
189
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | एका प्रतिष्ठित खासगी डॉक्टरांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवित व्हिडीओ पाठवून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी डॉकटर व कुटुंबियांना मागणाऱ्या टोळीच्या मुसक्या शिरवळ पोलीसांनी सापळा रचत आवळल्या असल्याची घटना आज घडली. यामध्ये पैसे घेण्याकरिता आलेल्या 2 युवकांना शिरवळ पोलीसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार सध्या फरार आहे. दरम्यान, शिरवळ पोलीसांच्या पथकाकडून सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नितीन नवनाथ प्रधान(वय 20), दत्ता आप्पाराव घुगे (वय24,दोघे रा.शिंदेवाडी ता.खंडाळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक प्रतिष्ठित खासगी डॉक्टर यांचा शिरवळ परिसरातील गावांमध्ये दवाखाना आहे. दरम्यान, संबंधित खासगी डॉकटर यांच्याकडे कामाकरिता असलेल्या एका महिलेची नातेवाईक असलेली एक साधारण 19 वर्षीय युवती वैद्यकीय सेवेकरिता असताना अचानकपणे बेपत्ता झाली.

याबाबतची बेपत्ता असल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी खाजगी डॉकटर यांच्या मोबाईलवर संबंधित युवतीबरोबरचा एक व्हिडिओ येत डॉक्टरांना संबंधितांकडून 1 कोटींची मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित खाजगी डॉक्टरांना आपल्यावर हनीट्रॅपचा प्रकार झाला असल्याचे निदर्शनास येताच संबंधित घटना डॉक्टरांनी आपल्या डॉक्टर पत्नींना देत फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्याकडे याबाबतची घटना सांगितली.

त्यानंतर राहुल धस यांनी याबाबतची कल्पना सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख,अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांना देत शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट,पोलीस अंमलदार अजित बोऱ्हाटे,अविनाश बा-हाळे, सुरज चव्हाण,प्रशांत धुमाळ,दिपक पालेपवाड,निलिमा भिलारे,स्नेहल शिंगटे यांच्या पथकाने शिरवळ येथील रामेश्वर गार्डन याठिकाणी सापळा रचत खंडणीपोटी दुचाकी (क्रं- एमएच-12-व्ही एस-5998) वरून आलेल्या नितीन नवनाथ प्रधान(वय 20),दत्ता आप्पाराव घुगे (वय24,दोघे रा.शिंदेवाडी ता.खंडाळा) यांना संबंधित डॉक्टर व त्यांच्या पत्नीकडून 1 कोटी रकमेपैकी 1.50 लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.

यावेळी पैसे स्विकारण्यासाठी आलेल्या संबंधितांना शुभम जलान (पूर्ण नाव माहित नाही)हा मुख्य सूत्रधार याबाबत दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करीत असल्याचे निदर्शनास शिरवळ पोलीसांच्या आले. यावेळी या घटनेनंतर खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून शिरवळ पोलीसांनी पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. याबाबतची शिरवळ पोलीस स्टेशनला डॉक्टरांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के या अधिक तपास करीत आहे.