2 लाखांची 4 गावठी बनावटीची पिस्तूली जप्त; कराडच्या दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | शिरपूर पोलिसांनी गुरूवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये कराड तालुक्यातील दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४ गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, १० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझिन, ७ हजार रुपये किमतीची ७ जिवंत काडतूसे असे एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.

निलेश हनुमंत गायकवाड (वय ३० रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) मनीष संजय सावंत (वय २२ रा. सोमवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बडवानी (मध्यप्रदेश) येथून दाढी वाढवलेले दोन व्यक्तीला गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून शिरपूरकडे जात असल्याची माहिती शिरपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार जयेश खलाणे यांनी तात्‍काळ पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार, पोलीस नाईक संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांना माहिती देत त्याठिकाणी तात्काळ रवाना केले.

मुंबई-आग्रा महामार्गावरील ब्लॅक हार्ट रेस्टॉरंटच्या समोर रोडवर, रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाला पायी येताना दिसले. सबंधित व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी हटकले असता त्यांना पोलीस आल्याचे समजल्यावर ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून शिताफीने त्यांना पकडले. पकडल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सदर व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांचे नाव,गाव विचारले. त्यांनी त्यांचे नाव निलेश हनुमंत गायकवाड (वय 30 रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) मनीष संजय सावंत (वय 22 रा. सोमवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा) असे सांगितले. त्यांची अंगझडती व त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी पिस्तूल आढळले.

त्यातून 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 4 गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, 10 हजार रुपये किमतीचे 2 अतिरिक्त मॅगझिन, 7 हजार रुपये किमतीची 7 जिवंत काडतूसे असे एकूण 1 लाख 97 हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी काॅन्स्टेबल इसरार फारूकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.