सातारा प्रतिनिधी । माण- खटाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सध्या चांगलेच टीकेचे फटाके उडू लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जयकुमार गोरे यांच्या विरोधात आघाडीचा उमेदवार कोण राहील, याबाबत उत्कंठा लागून राहिली होती. ती उत्कंठा काल प्रभाकर घार्गे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने संपली. मात्र, त्याचे पडसाद मतदारसंघात उमटू लागले आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांना शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचे रात्री कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेखर गोरे यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार साहेबांवर माझा रोष नसून घाटाखालच्या एका माणसाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आरोप करत त्यांनी नाव न घेता विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रभाकर घार्गे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ शेखर गोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना घाटाच्या वर आला तर याद राखा, असा इशाराच दिला आहे. यावेळी त्यांनी पडद्यामागच्या घडामोडी कार्यकर्त्यांसमोरच मांडल्या. यावेळी शेखर गोरे म्हणाले, “जयकुमार गोरे यांना पाडायचे असेल तर शेखर गोरेंशिवाय पर्याय नाही. शेखर तुम्हीच जयकुमार गोरे यांना पाडू शकता. शेखर तुम्हाला मी तुतारीवर लढवणार आहे, हे शरद पवार साहेबांचे शब्द आहेत. पवार साहेबांनी तुतारी चिन्हावर लढण्याचा शब्द दिला होता. तुम्ही सांगितले होते, ओबीसीला ओबीसी पाडू शकतो, तर पवार साहेब हा शब्द तुम्ही का पाळू शकला नाही.
उमेदवारीचा शब्द तीन वेळा दिलाय. पवार साहेब तुम्ही उमेदवाराचा प्रचार करण्यास याल तेव्हा तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगा, की तुतारीवर लढण्याचा शब्द दिला होता की नाही. पवार साहेब असे म्हटले होते की, लोकसभेत तुम्ही नसता तर ५० ते ६० हजार मतांनी आपला उमेदवार मागे पडला असता. पण ही सर्व मदत तुम्ही केली.”
शेखर गोरे यांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन
कार्यकर्त्यांनो मला फक्त दोन दिवस द्या. एकही कार्यकर्ता मला सोडून जाणार नाही. तुम्ही ज्या प्रेमापोटी आलाय. त्या प्रेमापोटी शपथ घेऊन सांगतो की, येणाऱ्या कालावधीत तीन महिन्यात आमदार होऊन दाखवीन. उद्धव ठाकरे यांच्यासारखा शब्द पाळणारा प्रामाणिक नेता माझ्या राजकीय आयुष्यात पाहिला नाही. त्यांनी शब्द दिला होता 2019 ला उमेदवारी देतो. त्यांनी शब्द पाळला. माझा राग शरद पवार साहेबांवर नाही. माझा राग राष्ट्रवादीच्या त्या घाटाखालच्या माणसावर आहे. तुम्ही कुठले घाटावरचे आणि निर्णय कुठला घेण्यास सांगतोयस घाटाच्या वरचा! पवार साहेबांनी शब्द दिला तेव्हा तुमचा भाऊ होता ना माझ्याबरोबर किती वेळा फसवणार, असासवाल शेखर गोरे यांनी रामराजें यांचे नाव न घेता केला.